Search best Flipkart deals

Friday, May 9, 2014

जगणे (प्रा) अनलिमिटेड !

पोस्ट जरा मोठी आहे पण जरुर वाचा..बघा काही फरक पडतोय का आपल्या आयुष्यात...
प्रत्येकाने वाचावा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख !
जगणे (प्रा) अनलिमिटेड !
दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’ कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा..आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच.’ हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण..तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना, की माझी खात्री आहे, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय अॅम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला ? मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं.
‘साफ चूक ! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून ! या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही ! मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या ‘अन्याया’विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा. आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल…तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत. त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला. ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, आमीर खान, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा…..’
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं. मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’जगत राहायची उर्जा देत राहील !
----नविन काळे

मौल्यवान काय? सोने की चांदी?



एका गावात एक विद्वान अर्थतज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर
पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक गावाच्या राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले . तो विद्वान राजाला भेटायला गेला .
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा त्या विद्वानाला म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा
असा बावळट का ? काही त्याला शिकवा त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय साधे ईतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने
हसू लागला हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
त्याने तुझ्यावर असला आरोप का लावला . या आधीपण लोकं मला
या बाबी वरुन हसायचे पण आता माझी चार लोकात खिल्ली
उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे
मग लोकं असे का करतात सांग मला"
" लोकांवर रुबाब करायसाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलवून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किंमती नाणे उचल ..
आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
पण मला सोने आणि चांदी याचे मुल्य कळत नाही असे त्यांनी
तुम्हाला का सांगीतले मला खरचं माहीत नाही ......."
विद्वान मुलाचे हे उत्तर ऐकून खूप विचारात पडला
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"
मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी
हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "


जीवनातही असे बर्‍याचं वेळा होते कोणाला मूर्खात काढण्यासाठी
आपण विनाकारण आपले नुकसान करुन घेतो .. आणि कधी
कोणी विनाकारण आपणास मुर्खात काढते पण त्यातून आपला फायदाचं होतो
हा एक खेळचं असतो कोणी हरत जिंकते आणि कोणी फक्त जिंकते .....
कोणी जिंकताना दिसते आणि कोणी न दिसताचं जिंकते ......
कोणत्याही बाजूला राहून खेळा ... मात्र नेहमीचं सकारात्मक असा.....
कोणी आपणास किती ही मुर्खात काढले तरी उगाच मनाला त्रास नका
करुन घेवू ... त्या गोष्टीला सकारात्मकतेने सामोरे जा आणि
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा ...
काय वाटते ????

पैसे

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो


पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते.

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥